नागपूर: पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या अटकेच्या मागणीवर आपण आजही ठाम आहोत. आपल्यासारखी इतरही आमदारांची हीच भूमिका आहे. खा राऊत यांच्याकडून यासंदर्भात उत्तर आल्यानंतर शिक्षा होईलच, विधानसभेत त्यांना बोलावले जाईल, अध्यक्ष पुढील निर्णय घेतील. शेवटी राज्यसभेत ते आमच्याच मतांवर निवडून गेले आहेत, असा दावा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपुरात विमानतळावर बोलताना आज (दि.४) केला.
राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी दिली आहे. राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शेवटच्या आठवड्यात निश्चितच शेतकऱ्यांना खुशखबर मिळेल. बजेटमध्ये चांगली बातमी येईल. शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असाही दावा सत्तार यांनी केला. शिवसेनेची आज जी काही स्थिती झाली आहे, ती खासदार संजय राऊत यांच्यामुळेच झाली. परिणामाची जाणीव न ठेवता ते नेहमी बोलत असतात. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकले म्हणून महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना त्यांची जागा कळेल, असा इशाराही सत्तार यांनी दिला. धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर अयोध्या येथून परतल्यावर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे धनुष्यबाण यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात फिरणार आहेत. यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे. आगामी निवडणुकीत या यात्रेचे मोठे योगदान राहणार असून जनता आमच्या सोबत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा