विदर्भ

Orphan Boy : अनाथ बालकाला ‘स्वीडन’मध्‍ये मिळाले हक्काचे घर

Shambhuraj Pachindre

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील काही अनाथ बालकांना वर्षाच्या सुरुवातीलाच हक्काचे पालक व घर मिळाले आहे. यातील एक बालक नुकतेच आपल्या नव्या आई-बाबांसह स्वीडनला रवाना झाले तर एक बालक लवकरच अमेरिकावासी होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या बालकांचे अंतिम दत्तक विधान नुकतेच पारित केले आहे. (Orphan Boy)

बाल न्याय अधिनियमांतर्गत अनाथ, सोडून दिलेले किंवा जमा केलेल्या बालकांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीच्या अधीन राहून दत्तक विधानाची कार्यवाही करण्यात येते. संभाव्य दत्तक इच्छुक पालकांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करायची असते. नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांच्‍या आत पालकांमार्फत आवश्यक दस्ताऐवज पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते. पालकांनी गृह अभ्यास अहवालाकरीता जवळची विशेष दत्तक संस्था निवडणे अपेक्षित असते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर दत्तक ग्रहणाचे अंतिम आदेश दिले जातात. यापूर्वी न्यायालयामार्फत आदेश दिल्या जात होते; परंतु आता हे आदेश जिल्हाधिकार्‍यांमार्फत पारित केले जातात. (Orphan Boy)

दत्तक नियमावलीनुसार न्यायालयासमोर प्रलंबित असलेले दत्तक प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणे नवीन नियम लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्यात १० प्रकरणांचा समावेश होता. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त दोन विशेष दत्तक संस्था कार्यरत असून, सदर संस्थांनी नवीन दत्तक नियमावली नुसार या बालकांचे परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे सादर केले होते. त्याअनुषंगाने दत्तक ग्रहण समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातुन बालकांच्या व पालकांच्या दस्ताऐवजांची तपासणी करण्यात आली

संबंधित प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्हाधिकार्‍यांना अंतिम आदेशाकरीता सादर करण्यात आले होते. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीलाच बदललेल्या नियमावलीनुसार दत्तक विधानाचा पहिला अंतिम आदेश जिल्हाधिकार्‍यांमार्फत पारित करण्यात आला. हा आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वीडन येथील पालकांना सुपुर्द करण्यात आला. .

जिल्ह्यात आतापर्यंत ६ देशांतर्गत व २ देशाबाहेर असे एकूण ८ प्रकरणातील दत्तक विधानाचे अंतिम आदेश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पारित केले आहेत. त्यामुळे अनाथ बालकांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे. देशाबाहेर दत्तक विधान झालेले दुसरे बालक लवकरच अमेरिकेत जाणार आहे.

दत्तक विधानाचा अंतिम आदेश स्वीडन येथील पालकांना देताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, संरक्षण अधिकारी महेश कामडी, वैशाली मिस्किन, विधी तथा परिविक्षा अधिकारी सुनंदा हिरुडकर, नितेश वैतागे, संत गाडगे महाराज शिशुगृहाच्या अधीक्षक मनिषा घुगुसकर, सामाजिक कार्यकर्त्यां उर्मिला श्रीरामे उपस्थित होते.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT