विदर्भ

यवतमाळ : नाथजोगी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दिनेश चोरगे

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा :  गावोगावी भटकंती करून भिक्षा मागून जगणाऱ्या नाथजोग्यांवर जमावांकडून हल्ले होत आहेत. परंपरागत चालत आलेला भिक्षा मागणे हा व्यवसायच आता संकटात आल्याने शासनाने पर्यायी व्यवसायासाठी मदत करावी, यासह अन्य मागण्यांसाठी नाथजोगी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील नाथजोगी समाज अनेक वर्षांपासून शासन दरबारी दुर्लक्षित आहे. या समाजाकडे परंपरागत भिक्षा मागण्याशिवाय दुसरा व्यवसाय नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक मर्यादा येतात. शासनाने या समाजातील कुटुंबाला दोन ते चार एकर जमीन द्यावी, जेणेकरून त्यावर उपजीविका करता येईल,समाजातील  शिकलेल्या तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज द्यावे, अशा प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी आंदोलन करून नाथजोगी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

नाथजोगी समाजबांधवांकडे संशयाच्या नजरेने बघून त्यांच्यावर हल्ले केले जातात. सध्या अफवांचे पेव फुटले असून बाहेर फिरणे कठीण झाले आहे. भटकणाऱ्या समाजबांधवांना शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून ओळखपत्र देण्यात यावे. जेणेकरून अनोळखी ठिकाणी जमावाच्या रोषाला बळी पडणार नाही, अशी व्यवस्था करावी. आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. नाथजोगी समाजाचे अध्यक्ष राजा गुलाब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नाथजोगी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT