Yavatmal Dahisawli farmers Death
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील दहीसावळी या गावात तीन दिवसांच्या अंतराने कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात २५ वर्षाच्या विपुल विश्वंभर घोरपडे व 55 वर्षीय नामदेव बाबाराव बावणे यांचा समावेश आहे. आज या दोन्ही कुटुंबाची दहिसावळी येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
एकाच गावात तीन दिवसांच्या अंतराने दोन आत्महत्या होत असून प्रशासन मात्र अद्यापही कुंभकर्णी झोपेत असल्याचे या भेटीदरम्यान समोर आले. अद्यापही तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन कुटुंबियांची माहिती जाणून घेतली नाही. याची खंत व्यक्त करत थेट जिल्हाधिकारी यांना फोन करून अनिल देशमुख यांनी धारेवर धरले. अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून मदत मिळण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांनमध्ये संताप निर्माण झाला आहे.
यामुळे निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिले होते की सत्ता येतात शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू, ते आश्वासन पाळावे, असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडाणा या गावात अतिवृष्टीमुळे हळदीचे पीक पूर्ण पाण्याखाली गेले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भर पावसात शेताची पाहणी केली.