नागपूर : शिवडी तसेच एल्फिन्स्टन रोड परिसरातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम रखडले होते. परंतु, आता या उन्नत मार्गाच्या एकूण कामापैकी 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुधारीत बांधकामाच्या संरचनेनुसार या मार्गाचे उर्वरित काम 30 सप्टेंबर 2026 पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री उदय सांमत यांनी विधान परिषदेत दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी आणि शिवडी दरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार आहे. याशिवाय वरळी ते अटल सेतू पर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
वरळी येथून जाणाऱ्या शिवडी जोडरस्त्याच्या कामास गती मिळण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार भाई जगताप, सुनील शिंदे, प्रविण दरेकर आणि सचिन अहिर यांनी सहभाग घेतला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी आता सुधारित बांधकामाच्या संरचनेनुसार प्रकल्पाचे उर्वरित काम 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.
वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामध्ये एलफिस्टन ब्रिज येथील प्राथमिक सर्वेक्षणानुसार एकूण 19 इमारती बाधित होत होत्या. तथापि, दरम्यानच्या काळामध्ये वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या आखणी मार्गामध्ये बदल झाल्यामुळे 19 इमारतींपैकी फक्त लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधित होत आहे. या रस्त्याच्या कामामुळे 83 कुटुंब बाधित होत असून त्यापैकी 3 कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार आर्थिक मोबदला देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या उर्वरित कुटुंबांचे त्याच परिसरात म्हाडाकडून एमएमआरडीएकडे प्राप्त होणाऱ्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.