शेफ विष्णू मनोहर यांनी मंदिराबाबत आज (दि.८) पत्रकार परिषदेत माहिती दिली. Pudhari Photo
नागपूर

लंडनला होणार जगातील सर्वात भव्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर; विष्णू मनोहर यांची माहिती

Vitthal Rukmini Temple London | पंढरपूर ते नागपूरमार्गे निघणार दिंडी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अवघ्या देशभरात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची, संत परंपरेची गाथा आता लवकरच जगभरात पोहोचणार आहे. काही वर्षात लंडन म्हणजेच युके येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य दिव्‍य मंदिर साकार होणार आहे. त्‍यानिमित्ताने १५ एप्रिलला पंढरपूर ते नागपूरमार्गे लंडन अशी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. 16 तारखेला ही दिंडी नागपुरात येत असून संध्‍याकाळी 5 वाजता विष्‍णू जी की रसोई, बजाज नगर येथे सर्वांच्‍या दर्शनासाठी पालखी ठेवली जाणार आहे, अशी माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी आज (दि.८) पत्रकार परिषदेत दिली. (Vitthal Rukmini Temple London)

विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्‍ज्ञ व एलआयटी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे दोन नागपूरकर या मंदिराच्या समितीचे सदस्य असून भारतातील समन्वयक राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना शेफ विष्णू मनोहर म्हणाले, अमेरिका, यूरोप, लंडन येथे इस्कॉन, अक्षरधाम, बालाजी तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे बघायला मिळतात. पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर तिकडे नाही. ही कमतरता भरून काढण्‍यासाठी लंडन येथील श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्‍नशील असून वारी सातासमुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे.

या प्रसंगी मोहन पांडे यांनी दिंडी यात्रेबद्दल सविस्‍तर माहिती दिली. ते म्‍हणाले, खरे तर दिंडीतील पादुका विमानातूनही लंडन येथे जाऊ शकतात. पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात. ही बाब ध्‍यानात घेऊन वारीची योजना करण्‍यात आली असून सुमारे २२ देशातून १८००० किलोमीटरची ही दिंडी प्रवास करणार आहे आणि भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचवणार आहे.

दिनांक, १५ एप्रिल 2025 ला पंढरपूर येथून पादुका मार्गस्थ होणार आहेत. 16 रोजी त्‍या नागपुरात येतील. यानंतर १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, यूरोप अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किमी एवढा प्रवास करतील. या निमित्‍ताने 22 देशातून वारीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सहकार्य केले असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य उत्पात यांनी त्यासंदर्भात उत्तम नियोजन केले आहे.

या उपक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एमआयटीचे विश्वनाथ कराड व वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिनी सर्वतोपरी मदत करण्‍याचे आश्वासन दिले आहे. यूके मधील ४८ मराठी मंडळ, आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी मंडळ या उपक्रमात संलग्न होत असून लवकरच हे भव्य मंदिर उभे करण्यात येणार आहे. तमीळ, कानडी, गुजराथी, तेलगू भाविकही या निमित्ताने जोडले जात आहेत. या लोकांना मराठी भाषा येत नाही पण अभंग म्हणता येतात. यानिमित्ताने महाराष्‍ट्र राज्यातील सातशे वर्षांची जुनी परंपरा, राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुख्मिणी जगभरात पोहोचणार आहे. या शुभकार्यास विठ्ठल पाटील यांनी १ किलो चांदी देऊन आशीर्वाद दिले आहे. प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी युके मॅंचेस्टर येथील प्रसिद्ध आयटी उद्योजक संग्राम वाघ, नागपुरातील पर्यावरण तज्‍ज्ञ व उद्योजक उत्कर्ष खोपकर, उद्योजक मिलींद देशकर, विजय जथे हे विशेष करून उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT