Winter session preparations
नागपूर : एकीकडे राज्यभरात नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच उपराजधानीत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाली आहे. दि.8 ते 19 डिसेंबर असा कालावधी ठरला असला तरी मुंबईत 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नेमके किती दिवस अधिवेशन चालणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
या अधिवेशनानंतर लागलीच जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू झाले आहे. विविध विभाग, मंत्रालयीन फायलींचा समावेश असलेले पाच ट्रक नागपुरात दाखल झाले असून अधिकारी, कर्मचारी नागपुरात मुक्कामी आले आहेत. सध्या थंडीचा जोर कमी झाला असला तरी 1 डिसेंबरनंतर नागपूरची हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवास येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कंत्राटदारांनी थकित बिलांसाठी पुकारलेले काम बंद मागे घेतल्यानंतर विधान भवन, रवी भवन, आमदार निवास येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. निवास व कार्यालयीन व्यवस्था संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. आमदार निवासातील सुविधाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी विधान भवन परिसरात कार्यालयीन दालनाची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. विविध पक्षांचे कार्यालय देखील हळूहळू सज्ज होत आहेत.