BJP West Bengal Victory celebration
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : सुमारे सहा दशकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बंगालमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथून टाकत सुवेंदु अधिकारी यांचे सरकार सत्तेत आले. या विजयाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 'झालमुडी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपथग्रहण सोहळा मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह सुरू असताना प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी बंगाली रसगुल्ला, आणि झालमुडीच्या संगतीने हा आनंदोत्सव भाजपनेते, माजी खासदार अजय संचेती, जिव्हाळा संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला.
सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विष्णुजी की रसोई येथे तीन हजारावर नागपूरकरांना ही झालमुडीची चव मोफत चाखता येणार आहे. अर्थातच आजवर खवय्येगिरीचे विविध विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विष्णु मनोहर यांनी हा कुठलाही विक्रम नाही. मात्र, माझ्या आवडीने मी हा बंगाल विजयाचा आनंद साजरा करीत असल्याचे सांगितले.
यासाठी भेळसारखे लागणारे शेव, चिवडा, चटपटी, शेंगदाणे, चना, तेल असे दीड हजारावर किलो साहित्य लागले. 18 पोते बंगाली मुरमुरे, झालमुडी मसाला खास बंगालवरून मागविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबून घेतलेला झालमुडीचा आस्वाद आता बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर सर्वसामान्यांना आनंदोत्सवाच्या निमित्ताने चाखण्याची संधी ठिकठिकाणी होत असलेल्या या 'झालमुडी महोत्सव' निमित्ताने उपलब्ध झाली आहे.