Nagpur Division Development
नागपूर : नागपूर विभागाला 2047 पर्यंत देशात अग्रगण्य औद्योगिक व सेवा केंद्र म्हणून उभारण्याचा महत्वाकांक्षी आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. त्यानुसार, 'विकसित नागपूर २०४७ शाश्वत विकास योजना अंतर्गत तब्बल ५.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील ६५ ले ७५ टक्के निधी हा खासगी क्षेत्रातून उभारला जाणार असून यामुळे नऊ लाखांहून अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मशन (मित्रा) संस्थेच्यावतीने नागपूर विभागाच्या शास्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेच्या समारोप निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जिआयएस मित्रा आपचे उद्घाटन आणि तीन एमओयू करण्यात आले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आधारे वाघ संवर्धन आणि इको टुरिझम सर्किट विकसित केले जाईल. बोर, गोसीखुर्द, रामटेक व खिंडसी परिसराचा विकास केला जाईल. वर्धा येथील सेवाग्राम आश्रम केंद्रस्थानी ठेवून पर्यटन सर्किट उभारण्याची मनिषा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मिओ ओका, मित्राचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी प्रामुख्याने उपस्थित होते.
सद्यस्थितीत नागपुरात १० ते १२ हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक प्रत्यक्ष उभारणी प्रक्रियेत आहे. १.८ लाख कोटीचे प्रस्ताव प्रक्रियेत तर उवरित २.७ लाख कोटी रुपये पुढील काळात उभारले जाणार आहेत. पुढील दहा वर्षांसाठी ग्रीन अँड झिलियंट इकोसिस्टम' अंतर्गत ३५ हजार कोटीच्या गुंतवणुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी ७.६ हजार कोटींचे प्रकल्प सुरू असून ५.२ हजार कोटीची गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे.
विदर्भात तांबे, लिथियम, पॅलेडियम टांगस्टन अशा महत्त्वाच्या खनिजांचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १७८ दशलक्ष टन लोखंड धातू साठा असून २५ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेच्या एकात्मिक स्टील प्रकल्पाचाही विचार सुरू आहे. भंडारा घाटीटोला वरघाट पट्ट्यात दुर्मिळ खनिज साठ्याची नोंद झाली असून भू भौतिकीय सर्व्हेक्षणाद्वारे शोध व विकास केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.