नागपूर : विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा,70 टक्के लोक विकले गेल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. नगरसेवकांना लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू असून, काही ठिकाणी ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. या पैशांचा स्रोत काय, पैसे देणारे आणि घेणारे कोण, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. व
डेट्टीवार म्हणाले की, विधान परिषद निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया न राहता पैशांचा बाजार बनली आहे. ७० टक्के लोक विकले गेले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी नगरसेवकांना पैसे दिल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, वर्धा-चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षातील काही नेत्यांवर आरोप केले असतील, तर त्यांनी त्यासंबंधीचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सादर करावेत.
केंद्र सरकारवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, देशात महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असून निर्यात क्षेत्रात घसरण होत आहे. बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक अस्थिरतेमुळे तरुणांमध्ये तीव्र नाराजी आहे. देशातील युवक आता आपले प्रश्न ठामपणे मांडत असून परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षांमधील गैरकारभाराबाबत आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रोल करणे, त्यांना देशद्रोही,पाकिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
ओबीसी समाजाविषयी सरकारची भूमिका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मते मागायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करायचे, हे सरकारचे धोरण बनले आहे. राज्यातील ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि इतर मागास घटकांची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक व आर्थिक सवलती दिल्या जात नाहीत.
बार्टी, सारथी आणि इतर संस्थांना समान निधी देऊन समान विकास साध्य होऊ शकत नाही. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना सवलती, शैक्षणिक सुविधा दिल्या पाहिजे,अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.