नागपूर : अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या वक्तव्यात 39 आमदार भेटल्याचे सांगितले जाते. केवळ “माझं नाव का घेत आहात?” असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांना साथ देणारे आणि श्रद्धा ठेवणारे उच्च पदस्थ लोक आहेत. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कायद्याच्या विरोधात वागणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. केसरकर यांनी त्या 39 आमदारांची यादी जाहीर करावी. यासंदर्भात पेन ड्राइव्ह उघड झाला तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसेल. आणि सरकार अडचणीत येईल असा दावा काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
मध्यंतरी लहान मुलीच्या शोषणाच्या प्रकरणात एन्काऊंटर करण्यात आला होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला, कारण मोठ्या लोकांना वाचवायचे होते. उद्या खरात यांच्याबाबत काहीही घडू शकते आणि अनेक पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. कायद्याने खरात यांना शिक्षा झाली पाहिजे. अमावस्येच्या दिवशी मोठे नेते अंधारात आपली पापे लपवण्यासाठीच जात असावेत. अशा भेटींची चौकशी झाली पाहिजे. एसआयटीकडून काही ठोस निष्पन्न होत नसल्यास, न्यायाधीशांच्या पुढाकाराने चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
गॅस सिलेंडरसाठी रांगा, मृत्यू
देश मोदी सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे. निवडणुका जिंकणे आणि सत्ता मिळवणे हेच भाजपचे काम आहे. कोरोनाच्या काळात जसे लोकांचे जीव धोक्यात आले, तसेच आता गॅस सिलेंडरच्या रांगेत नागरिकांचे मृत्यू होत आहेत. छगन भुजबळ यांनी सांगितले की, पंधरा दिवसांत एलपीजीचा मोठा तुटवडा भासू शकतो. इराण पूर्वी आपला मित्र होता, पण आता तो दूर गेला आहे. केवळ हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तान या मुद्द्यांवर देश पुढे जाऊ शकत नाही. भारताचे परराष्ट्र धोरण कुचकामी ठरत आहे.
ऑपरेशन टायगर, फुसका बार
शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या नवीन खासदार आहेत. खासदार झाल्यानंतर लक्ष वेधण्यासाठी त्या अशा प्रकारची वक्तव्ये करत असाव्यात असे मला वाटते. दुसरीकडे राष्ट्रवादी विलीनीकरण हा त्यांचा विषय आहे त्यांच्या अंतर्गत वादांमध्ये मला पडायचे नाही. मात्र, सध्याची राष्ट्रवादीची वाटचाल फार काळ टिकेल असे वाटत नाही. भारतीय जनता पार्टी एकेक पक्ष गिळंकृत करण्याचे काम करत आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल दिसतील.संघटन सृजन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ती अनेक राज्यांमध्ये सुरू आहे. 15तारखेपर्यंत हे अभियान चालणार असल्याचे स्पष्ट केले.