भूमिगत पार्किंग बांधकामाबाबत विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते. Pudhari File Photo
नागपूर

दीक्षाभूमीवरील खड्डे बुजवा, अन्यथा...; वडेट्टीवार यांचा इशारा

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला विरोध

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमीवर सुरु असलेले काम जनभावना लक्षात घेता तात्काळ रद्द करून खोदण्यात आलेला गड्डा हा समतोल केला पाहिजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (दि.१) माध्यमांशी बोलताना केली. १५ दिवसात हे काम झाले नाही, तर जनता स्वतः हा खड्डा बुजवेल तसेच संतप्त जनता कायदा हातात घेईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसरात लोकांच्या उद्रेकामुळे उदभवलेल्या परिस्थितीची व सुरू असलेल्या भूमिगत पार्किंग बांधकामाची पाहणी करत या पार्किगला विरोध दर्शवला. हा प्रकल्प कसा सुरू झाला. या ठिकाणी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. बाबासाहेब यांचा अस्थीकलश आहे. या अस्मितेला हानी पोहचणार नाही, याची काळजी घेतली जावी. दीक्षाभूमी हे मोठे श्रद्धास्थान आहे.जनतेच्या भावनेचा विचार झाला पाहिजे होता. दीक्षाभूमीत लाखोच्या संख्येने लोक येतात. या स्तुपाला धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार असेल, हा पैसे कमावण्याचा धंदा आहे का? असा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला. स्मारक समितीचा निर्णय मान्य नसेल, तर जनतेचा उद्रेक होईल, याचा विचार करून हे काम रद्द केले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

उद्या विरोधीपक्ष नेते म्हणून सभागृहात हा विषय उद्या मांडणार असून सरकारने कामाला स्थगिती दिल्याने तातडीने ही जागा समतोल करुन पार्किंगसाठी खोदलेले खड्डे बुजवले पाहिजेत. यासोबतच सौंदर्यीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना सरकार निधी देत असते, हे जरी खरे असले तरी कुठलेही काम होत असताना जनतेचा भावनेचा विचार करून निर्णय घ्यावा. पण या ठिकाणी तसे झालेले दिसत नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर आलेले लोक कुठे थांबणार? हा प्रश्न असून दिक्षाभूमीवरील ग्राऊंड खराब झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT