Vijay Wadettiwar on Baban Lonikar
नागपूर: यापूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आता भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी 'शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशांतून चालतात', असे बोलणे म्हणजे भाजपला आलेली ही सत्तेची मस्ती असून भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोण स्पष्ट करतो, मात्र शेतकरी तुम्हाला शून्यावर आणतील, असा इशारा काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांबद्दल बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात नको ते वादग्रस्त वक्तव्य केले. एका गावात कुणालातरी उद्देशून बोलताना ते म्हणाले, 'तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या आईला, बहिणीला, बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट, चपला आम्हीच दिल्या. ते कट्ट्यावर बसलेले पाच - सहा कारटे. त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला.' या त्यांच्या वक्तव्यावरून राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहीणींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
लोणीकरांच्या उपरोक्त वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी X वर संतप्त प्रतिक्रिया दिली. हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी.
सरकारी योजना या भाजपने स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिल्यागत सांगणं, ही महाराष्ट्रातील जनतेची थट्टा आहे. हे पैसे जनतेचे आहेत, त्यात महायुतीच्या मंत्र्यांचे कर्तृत्व म्हणजे धनादेश वाटताना फोटो, सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा तुम्ही आज सत्तेत आहात ते शेतकरी आणि जनतेच्या मतांमुळे आणि तोच शेतकरी गरज पडल्यास तुमचे मुल्य पुन्हा शून्यावर आणू शकतो, 'असा इशाराही दिला.