Vidhan Parishad Election 2026
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार जाहीर झालेले नसताना पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक काँग्रेस नगरसेवक सध्या 'नॉट रिचेबल' असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.दरम्यान, राज्यात आता फोडाफोडीचा उत्सव सुरु झाला आहे, असा आरोप करत पक्षाचा व्हीप झुगारुन जाणार त्यांच्यावर कारवाई होणार, असे वडेट्टीवारांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
काँग्रेसचे ३०० पेक्षा अधिक नगरसेवक पूर्व विदर्भात आहेत. आता यातील ६० नगरसेवक 'नॉट रिचेबल' असल्याने काँग्रेससाठी आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अलीकडेच विजय वडेट्टीवार आपल्या मुलीच्या विवाह समारंभात व्यस्त होते. आजवर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे बहुतांश समर्थक विविध ठिकाणी सहलीला गेल्याचे, तसेच भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपकडून उद्योजक अरुण लखानी यांचे देखील नाव उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांत भाजप वर्तुळात जोरात चर्चेत आहे. लखानी यांच्या मुलाचा विवाह खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीशी निश्चित झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अद्याप उमेदवार निश्चित झालेले नसताना नगरसेवकांची ही पळवापळवी, यावरून ही निवडणूक यावेळी देखील मोठी चुरशीची आणि मोठ्या आर्थिक व्यवहाराची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.