नागपूर - नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने येत्या १४ आणि १५ मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. ऊन सावलीचा लपंडाव सुरू होता. रात्री काहीसा उकाडा जाणवत होता. दोन दिवस विदर्भाला 'ऑरेंज अलर्ट'चा इशारा दिला गेला आहे. प्रामुख्याने गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा यात समावेश आहे.
मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱ्याची दिशा बदलली आणि वेग देखील वाढल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे.आठवडाभर असेच ढगाळ वातावरण असेल असा अंदाज असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण पुढील आठवडाभर कायम राहणार आहे.
मे महिन्यात नागपूर चंद्रपूर आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होते. मात्र, यंदा हवामानात कमालीचा बदल झालेला दिसतोय. गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आहे. तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सिअसने खाली आले आहे. एरवी मे महिन्यात विदर्भात सरासरी तापमान हे ४५ ते ४७ डिग्रीपर्यंत असते यावेळी मात्र, वातावरणात बदल झाल्याने तापमानाचा पारा घसरला आहे.