प्रातिनिधीक छायाचित्र  Pudhari
नागपूर

Vidharbha News | जलसंधारणाचा नागपूर पॅटर्न ठरतोय प्रभावी, विदर्भात ५४ हजार ४१३ कामे पूर्ण!

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत : १३८.९३ लक्ष घन मीटर गाळ काढला

पुढारी वृत्तसेवा

 नागपूर : शेतीला शाश्वत सिंचनासोबत कृषी उत्पादन वाढविण्यासाठी मृद व जलसंधारणांतर्गत जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विविध विभागाच्या अभिसरणासोबत पाणलोट विकासांतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तसेच माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागात जलसंधारणांतर्गत ६५ हजार १७३ कामे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ५४ हजार ४१३ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच १० हजार ७६० कामे प्रगतीपथावर आहेत. 

  शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या संवर्धानासोबतच जलसंधारणाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत प्रत्येक गावात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागातील ७६९ गावांमध्ये २५ हजार १५९ उपाययोजना तर नागपूर विभागातील ७४२ गावांमध्ये १५ हजार १०२ कामांचे नियोजन करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पासाठी ९५३ कोटी ६७ लक्ष रूपये किमतीच्या कामाचे आराखडे तयार करण्यात आले आहे. त्यापैकी जुलै अखेर पर्यंत ३४ हजार १८४ कामे पूर्ण झाली असून, या कामांवर ६७२ कोटी १९ लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला आहे. 

 जलयुक्त शिवार अभियान २.० विशेष निधीअंतर्गत नागपूर-अमरावती विभागातील २०७० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये १६ हजार २७८ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांवर ७९६ कोटी ९८ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. विशेष निधीअंतर्गत जुलै अखेर १३ हजार ६९२ कामे पूर्ण झाली असून या कामांद्वारे ५५५१ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला आहे. विशेष निधीअंतर्गत अमरावती विभागातील ९६९ गावांत ९ हजार ८९ कामांची निवड करण्यात आली असून, या कामांवर ४९९ कोटी ८१ लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६ हजार ८३४ कामे पूर्ण झाली आहेत. 

 नागपूर विभागातील १ हजार १०१ गावांची जलसंधारणाच्या विशेष निधीअंतर्गत निवड करण्यात आली आहे. यातंर्गत ७ हजार १८९ कामे मंजूर करण्यात आली असून यावर २९७ कोटी १७ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ६ हजार ८५८ कामे पूर्ण झाली आहेत. 

मामा तलावांचे बळकटीकरण

 विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.  विभागातील १ हजार ४९ मामा तलावांच्या बळकटीकरणासाठी २३१ लक्ष रूपये खर्च करण्यात येत असून ३९५ तलावांचे बळकटीकरण पूर्ण झाले आहे. 

 नागपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणांतर्गत २७ कामांना मंजुरी देण्यात आली असून १२ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ३६० कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी, १७२ कामे पूर्ण झाली, १८६ कामे प्रगतीपथावर आहेत.

 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियांतर्गत विभागातील जलसाठ्यातील १३५.७४ ल.घ.मी गाळ काढण्यात येणार आहे. त्यापैकी ८५.७९ लक्ष घ.मी गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. नाला खोलीकरण व रूंदीकरण यातंर्गत १२९.८७ लक्ष घ.मी गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून त्यापैकी ५३.१४ ल.घ.मी नाला खोलीकरण व रुंदीकरणांतर्गत गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 नागपूर विभागातील या योजनेंतर्गत २३ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, ४ हजार १३६ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी आतापर्यंत ३ हजार ३४२ कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर ७८ कोटी ७६ लक्ष रूपये खर्च झाला आहे. पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन २.० अंतर्गत नागपूर व अमरावती विभागात ४७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार ५५७ कामांपैकी ६ हजार १२३ कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १५४ कोटी १५ लक्ष रुपये खर्च झाले आहेत. 

 नागपूर व अमरावती विभागात मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्रामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असून, अपूर्ण कामे नियोजित वेळात पूर्ण करण्यात येणार असून शेतीला सिंचनासोबतच भूर्गभातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. या उपक्रमामुळे कृषी उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार  आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT