नागपूर

विकोचे चेअरमन यशवंतराव पेंढरकर यांचे निधन

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव केशवराव पेंढरकर (वय ८५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय आणि दीप, मुलगी दीप्ती, नातवंड असा परिवार आहे.

यशवंतराव पेंढारकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला वेळोवेळी फायदा झाला. सेंट्रल एक्साइजविरुद्ध सुमारे ३० वर्षे चाललेला खटला जिंकण्यात कंपनीला यश प्राप्त झाले. त्यांनी काही काळ कंपनीत संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले, त्यांच्या नेतृत्वात कंपनीने प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले. त्यांच्याच चेअरमनशिप अंतर्गत कंपनीला इकॉनॉमिक टाइम्सचा 'ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत. एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्योगिक विश्वात ओळख होती. त्यांचा संस्कृत भाषेवर पगडा होता. त्यांना धार्मिक ग्रंथांच्या वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्या निधनाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत आणि समंजस व्यक्तिमत्त्व तसेच उद्योजक गमावल्याची भावना उद्योग विश्वात व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT