Uddhav Thackeray Ram Raksha Andolan Pudhari
नागपूर

Nagpur Politics: आज उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण; समर्थक, विरोधकांचे बॅनर्स हटवल्याने वातावरण तापले

Uddhav Thackeray Ram Raksha Andolan: अयोध्येतील राममंदिरात झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज शनिवारी (दि.18) उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे रामरक्षा पठण आणि महाआरती रामनगर येथील राम मंदिरात होणार आहे. दुसरीकडे या उपक्रमाच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी आणि विरोधात लावलेले माजी खासदार नवनीत राणा समर्थकांनी लावलेले ठाकरे यांना चिमटा काढणारे होर्डिंग्ज उपराजधानीत हटविण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारी साडेतीन वाजताची वेळ आहे.

दरम्यान, कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न होत आहे. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला तर हा कार्यक्रम ढोंगीपणा आहे', अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. अयोध्येतील राममंदिरात झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नागपुरातील रामनगर राममंदिरात हे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमासाठी आम्ही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कग्रेिससह इतर सर्व पक्षांना निमंत्रण दिले आहे. राम आमचे एकट्याचे किंवा भाजपचे नाहीत. आम्ही रामाचे मालक नाही. राम सर्वांचे आहेत. मात्र, रामाच्या नावाने हजारो कोटी लुटले गेले, ही आमच्यासाठी चिंतेची आणि शरमेची बाब असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमानंतर मंदिरासमोरील बाजीप्रभू देशपांडे चौकात मुख्य रस्त्यावरच ठाकरेंची सभा होईल, असेही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. राऊत यांनी रविभवन येथे ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन रामरक्षा पठण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी संपर्क प्रमुख सतीश हरडे, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपची बैठक

दरम्यान, शिवसेनेचा रामरक्षा महाआरती कार्यक्रम होत आहे त्याच्या शेजारील मैदानावर २२ जुलै रोजी भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होणार आहे. या आयोजनासंदर्भातील एक बैठक आजच शनिवारी सायंकाळी होत आहे. एकंदरीत प्रशासनाची यानिमित्ताने कसोटी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT