राजेंद्र उट्टलवार
नागपूर : अयोध्येतील श्री राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या आंदोलनाचा दुसरा टप्पा येत्या १८ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातून, म्हणजेच नागपुरातून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन राम नगरातील राम मंदिरातून सुरू करण्याचे नियोजित असल्याने आता त्याला राजकीय वळण मिळाले आहे.
मंदिराचा राजकीय आखाडा करू नका: प्रशासन
या आंदोलनावर मंदिर प्रशासनाने तीव्र आक्षेप घेतला आहे. रामनगर राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी स्पष्ट केले की, "आमच्याकडे अद्याप कोणताही अर्ज आलेला नाही. मंदिराचे दरवाजे सर्व भक्तांसाठी खुले आहेत, तुम्ही येथे येऊन रामरक्षा किंवा हनुमान चालीसा पठण करू शकता. मात्र, हे मंदिर आहे, राजकीय आखाडा नाही. येथे आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून या; आंदोलन करायचे असेल तर मंदिराबाहेर करा."
उद्धव ठाकरे आणि भाजपचा 'कलगीतुरा'
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दुपारी ३.३० वाजता आरतीसाठी मंदिरात जाणार असून त्यानंतर बाहेर आंदोलन करणार आहेत. यावर भाष्य करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, हे प्रशासन ठरवेल," असे म्हणत त्यांनी या विषयावर आपली नाराजीही व्यक्त केली.
आदित्य ठाकरेंची मागणी
दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत, "कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरात दानाची लूट सुरू असून मुख्य आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी केली आहे. संघ मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात होत असलेल्या शिवसेनेच्या या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.