Zaheer Alam Passes Away: 1990 च्या दशकात संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘तुम तो ठहरे परदेशी, साथ क्या निभाओगे’ या सुपरहिट गीताचे गीतकार जहीर आलम यांचं नागपुरात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे हिंदी संगीतविश्वातील एक महत्त्वाचा, पण काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिलेला आवाज कायमचा हरपला आहे.
जहीर आलम हे नागपूरमधील मोमीनपुरा भागातील एका छोट्याशा घरात वास्तव्यास होते. एकेकाळी देशभर गाजलेल्या गाण्याचे बोल लिहिणाऱ्या या कवीचं आयुष्य मात्र संघर्ष, आर्थिक विवंचना आणि उपेक्षेत गेलं. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकरांच्या आणि संगीतविश्वाच्याही विस्मरणात गेले होते.
‘तुम तो ठहरे परदेशी, साथ क्या निभाओगे’ हे गाणं सुरुवातीला स्थानिक पातळीवर गायलं जात होतं. मात्र, गायकअलताफ राजा यांनी हे गाणं आपल्या खास शैलीत सादर केल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 1990 च्या दशकात हे गाणं अक्षरशः घराघरांत पोहोचलं आणि अल्ताफ राजांना मोठी ओळख मिळवून देणारं ठरलं.
या एका गाण्याने संगीत क्षेत्रात अनेकांना प्रसिद्धी, पैसा आणि करिअर मिळवून दिलं. मात्र, या गीताचे मूळ शब्द रचणारे जहीर आलम मात्र आर्थिक अडचणींमध्येच आयुष्य जगत राहिले. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या गाण्याचा खरा शिल्पकार मात्र कायम प्रकाशझोतापासून दूर राहिला.
जहीर आलम यांच्या निधनानंतर नागपूरच्या साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या शब्दांनी एका पिढीच्या भावना व्यक्त केल्या, पण त्यांना मान-सन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळालं नाही, ही खंत अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.