पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपूर येथील राजभवनाच्या प्रांगणात दिमाखदार सोहळ्यात झाला. यावेळी ३३ कॅबिनेट, ६ राज्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. १८ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, उदय सामंत, संजय शिरसाट, शिवेंद्रराजे, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, नितेश राणे आदींनी पदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, तानाजी सावंत या ज्येष्ठ माजी मंत्र्यांसह १२ जणांना वगळण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, राधानगरीचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली.
दरम्यान, शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचा कार्यकाळ केवळ अडीच वर्षांचा असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आम्हाला अडीच वर्षांची संधी दिली आहे. अडीच वर्षांत आम्ही आमच्या खात्याला कसे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करतो?. आम्ही किती न्याय किती देतो?. हे महत्त्वाचे आहे. अडीच वर्षांत जरी आम्ही त्याच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही, तर आम्हाला दूर करण्याची जबाबदारी आम्ही नेत्यांना दिली आहे. त्याची भीती माझ्या मनामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मला जर बाजूला केले किंवा अन्य कोणाला केले तर त्यात दुःख वाटून घेऊ नये.'' असे सामंत म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, दिलेला शब्द पूर्ण करणारे असे एकनाथ शिंदे नेते आहेत. कुणाचीही संधी गेलेली नाही. सर्वांना संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मी स्वतः नरेंद्र भोंडेकर, अर्जुन खोतकर यांना भेटणार आहे. त्यांच्यामध्ये मंत्री होण्याची क्षमता होती. पण या सगळ्यात केवळ ११ जणांना मंत्री करायचे होते. शिंदे साहेबांची अडचण समजून घेतली पाहिजे, असेही सामंत यांनी नमूद केले. खाते वाटपाबाबत ते म्हणाले, "येत्या दोन-तीन दिवसांत खात्यांची घोषणा केली जाईल..."
आम्ही नक्षलवादी जिल्हा बदलवण्यासाठी काम केले. महाराष्ट्राचा विदर्भाला न्याय देण्यासाठी अधिवेशन घेतले जात आहे. आज मंत्र्यांची ओळख होईल, असेही त्यांनी सांगितले.