Shraddha Dubey arrested Nagpur: लखनऊमधील व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणात ११ दिवसांपासून उत्तर प्रदेश पोलिसांना गुंगारा देणाऱ्या श्रद्धा दुबेला नागपुरात अटक करण्यात आली आहे. तिच्यासोबत तिची बहीण आणि चालकालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेश पोलीस आणि उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (STF) ची पथके तिचा अनेक शहरांत शोध घेत होती. पोलिसांनी श्रद्धा, तिची बहीण आणि चालकाची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, ती आग्रा येथील एका हॉटेलमध्ये असल्याचीही माहिती समोर आली होती. लखनऊमधून नेपाळला पळून जाणे, पुन्हा लखनऊला परतणे, माध्यमांना मुलाखती देणे आणि त्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणे, अशा तिच्या हालचालींमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धा दुबे, तिची बहीण आणि चालक बुरखा घालून प्रवास करत होते. उत्तर प्रदेश STF ने तिचा ठावठिकाणा शोधून काढला आणि नागपूर पोलिसांच्या मदतीने तिला अटक केली. पोलीस या तिघांना ट्रान्झिट रिमांडवर नागपूरहून लखनऊला घेऊन जाणार आहेत.
शिवा शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, जेव्हा उत्तर प्रदेश पोलीस तिचा उत्तर प्रदेशपासून नेपाळपर्यंत शोध घेत होते, तेव्हा श्रद्धा दुबे अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत होती. सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे ती लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होती. दसऱ्यानंतर शरण येण्याची तिचा फ्लॅन होता. मागील काही दिवस ती नामांकित वकिलांच्या संपर्कातही होती. दरम्यान, श्रद्धा सतत आपली जागा बदलत होती; याआधी ती नेपाळला पळून गेल्याच्याही बातम्या आल्या होत्या. नंतर असे समजले की ती उत्तर प्रदेशात परतली होती. ती लखनौमध्ये असल्याचे वृत्त होते, जिथे तिने कथितरीत्या एक 'वकालतनामा' स्वाक्षरी करून दिला होता. तिथून ती आग्राला गेली आणि त्यानंतर मध्य प्रदेशातील सतना मार्गे नागपूरला पोहोचली. नागपूरमध्ये, उत्तर प्रदेश एसटीएफने (UP STF) स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला, तिच्या बहिणीला आणि त्यांच्या चालकाला अटक केली.
शिवाच्या आई, रंजना यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र पाठवून सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये हत्येची निष्पक्ष चौकशी आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. त्यांनी हे पत्र भाजपचे आमदार नीरज बोरा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सोपवले. पत्रात रंजना यांनी मुख्यमंत्री योगी आणि पोलिसांवर विश्वास व्यक्त करत, आपल्याला न्यायाची अपेक्षा असल्याचे म्हटले होते. . त्यांनी विनंती केली आहे की, ही चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व्हावी. ही चौकशी एका निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची विनंती केली आहे. आरोपी—मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी, त्यांचा चालक दानिश आणि इतर—यांच्या विरोधात पुरावे उपलब्ध आहेत. रंजना यांनी आपल्या कुटुंबासाठी संरक्षणाची मागणी करण्यासोबतच, न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहकार्य मिळण्याचीही विनंती केली आहे.