Nagpur Political News
नागपूर : वारंवार आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन देऊनही ते न पाळणाऱ्या महायुती सरकारविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली होती. "सातबारा कोरा करू, "शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू" अशी घोषणाबाजी केली होती. पण निवडणूक झाली, सत्ता मिळाली, आणि केंद्रात व राज्यात भाजपची सरकार आले. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची एकही ठोस अंमलबजावणी झाली नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता सार्वजनिकपणे सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे सरकारला शक्य नाही. हा सरळसरळ शेतकऱ्यांच्या भावनांशी, त्यांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात आहे, असा आरोप माजी खासदार प्रकाश जाधव यांनी केला.
शेतकरी विरोधी धोरणाचा शिवसेना (ठाकरे गट) नागपूर ग्रामीणच्या वतीने जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम मस्के आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात तालुका प्रमुख, तालुका संघटक, शहर प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी, कामगार, युवक व सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.