नागपूर हादरलं! "आता जगण्यात अर्थ नाही..."वृद्ध दाम्पत्याने उचललं टोकाचं पाऊल, पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू
नागपूर: शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजारपण, वाढतं वय आणि मुलांच्या अनुपस्थितीमुळे आलेला एकटेपणा असह्य झाल्याने एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. या दुर्दैवी घटनेत पतीचा मृत्यू झाला असून, पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे शहरांमधील विभक्त कुटुंबपद्धती आणि एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगर परिसरात राहणारे गंगाधर हरणे (वय ८०) आणि त्यांच्या पत्नी निर्मला हरणे (वय ७०) यांनी काल राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच शेजारी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला. निर्मला हरणे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे.
'या' कारणांमुळे संपवले जीवन
सुसाईड नोटमध्ये वाढत्या वयामुळे आलेली हतबलता, सततचे आजारपण आणि औषधोपचारांचा ताण, घरात कोणी नसल्याने येणारा एकटेपणा या कारणांना कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचे देखील त्यांनी या चिठ्ठीत नमूद केले असल्याचे समोर आले आहे.
एकटेपणाची शोकांतिका
हरणे दाम्पत्याचा मुलगा नोकरीनिमित्त नागपूरबाहेर वास्तव्यास आहे, तर मुलीचे लग्न झाले असून ती तिच्या सासरी राहते. त्यामुळे समर्थ नगरातील घरात हे वृद्ध दाम्पत्य एकटेच राहत होते. मुलांचे उत्तम संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केल्यानंतर उतारवयात एकाकीपणा वाट्याला आल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येते. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने केवळ एका कुटुंबाची शोकांतिका समोर आणली नाही, तर वेगाने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत ज्येष्ठांच्या वाट्याला येणाऱ्या एकाकीपणाचे भीषण वास्तव अधोरेखित केले आहे.

