Devendra Fadnavis  (Pudhari Photo)
नागपूर

Devendra Fadnavis | शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नव्हे, नेत्यांचा विरोध: ९५ टक्के लोकांचे समर्थन: मुख्यमंत्री फडणवीस

Nagpur Political News | नागपुरातील रामगिरी शासकीय निवासस्थानी निवडक पत्रकारांशी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम निमित्ताने मारल्या गप्पा

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis on Shaktipith Highway

राजेंद्र उट्टलवार

नागपूर: धाराशिवपर्यंत शक्तिपीठ महामार्गाला कुठलीही अडचण नाही. ९५ टक्के लोकांचे समर्थन आहे. मुळात नेत्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांचा नाही. मध्यंतरी मोठा मोर्चा निघाला. आलयमेंट चेंज करून चंदगडवरून नेणार असे ठरले. आता नव्याने सोलापूर सांगलीमार्ग असा पण पर्याय आला आहे. सर्व दृष्टीने कमीत कमी सुपीक शेत जमिनीचे भूसंपादन व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. शेवटी कुठलाही विकास प्रकल्प असू द्या, विरोध हा होतच असतो. शेतकऱ्यांशी चर्चेतून मोबदला चांगला असेल, तर विरोध होत नाही, हा आपला अनुभव आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नागपुरातील रामगिरी शासकीय निवासस्थानी निवडक पत्रकारांशी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम निमित्ताने त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. यानिमित्ताने त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांचीही फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी पुरणपोळी आवडते, असे सांगितले होते. यावर या दिवाळीला बदललेला लुक घरी कमी बाहेर अधिक आवडला, असे मिश्किलपणे कबूल करताना त्यांनी आपल्याला पुरणपोळी कधीच आवडली नाही. मला डार्क चॉकलेट खायला अधिक आवडते, असे त्यांनी सांगितले.

मी महाराष्ट्रात 2029 पर्यंत काम करत राहणार आहे. यामुळे दिल्लीला जाण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील विरोधकांच्या चर्चांचे खंडन केले. हल्ली हिंदी भाषेतील संवाद वाढल्याने राष्ट्रीय पातळीवर, दिल्लीत काही महत्वाची जबाबदारी स्वीकारणार का?, या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते.

अनेकजण म्हणतात मी गंभीर वाटतो, मला आनंद वाटतो. पण मुळात मी तसा झालो नाही. कधीकाळी मी म्हणत आलेली कविता विरोधक म्हणत आहेत. आता वर्षपूर्तीच्या निमित्ताने मी नवीन कविता शोधतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. आव्हानांची सवय झाल्याने, उपायांचे टायमिंग योग्य असल्याने आता कशाचीच चिंता वाटत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कमी झालेला नक्षलवाद, नव्याने गुंतवणूक येऊ घातलेले नागपूर, मतदार यादीत घोळात गोंधळलेले, एकवाक्यता नसलेले विरोधक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवादावर आपले मत व्यक्त करत सांगितले की, एकीकडे जंगलातील नक्षलवाद कमी होत असताना आता शहरी नक्षलवाद हा नव्याने उद्भवलेला आव्हान आहे. “जंगलातील नक्षलवाद कोण होता हे ओळखता येत असे; शत्रू कोण हे माहित असायचे आणि तो गोळ्या घालणार हे स्पष्ट असायचे. पण आज कोण शत्रू आहे हे समजत नाही आणि ते काय करत आहेत हे पाहावे लागेल,” असे ते म्हणाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, जातीचे राजकारण नेत्यांच्या मनात अधिक असते, पण जनतेच्या मनात तसे नसते. नागपुरात नवीन विधानभवन सुसज्ज होणार असून, पायाभूत सुविधा वाढल्यामुळे नागपुरमध्ये गुंतवणूक चांगली येत आहे. त्यांनी गडचिरोलीतील जेएसडब्ल्यू प्रकल्प जुनी जागा रद्द झाली असून आता नवीन जमिनींच्या वाटाघाटी सुरू असल्याचेही सांगितले.

गुजरातमध्ये मंत्री परफॉर्मन्स ऑडिट अडीच वर्षांत झाले आहे, तर महाराष्ट्रात केवळ एक वर्ष झाले आहे. मिहान आणि जीएमआरच्या समस्या १५ दिवसांत सुटतील असे त्यांनी आश्वासन दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप एकदम मजबूत असून, मुंबईतही स्थानिक राजकारण पाहून निर्णय घेण्यात येतील. काही ठिकाणी प्रिपोल, काही ठिकाणी पोस्ट पोल युती राहील. नागपुरात पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार लवकरच निश्चित केला जाणार आहे. सुधाकर कोहळे नोंदणीसाठी जोरात सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजपर्यंत काँग्रेसला वैचारिकदृष्ट्या एवढा गोंधळलेला कधी पाहिला नाही. संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ना त्यांच्यावर कुणाचा विश्वास, ना त्यांच्याकडे शक्ती आहे. त्यामुळे संविधानाला आणि लोकशाहीला धोका निर्माण होत आहे. मतदारयादीत दोष आहे हे त्यांनी मान्य करून विरोधकांना योग्य वेळी पुराव्यासहित ही माहिती मांडणार असल्याचा इशारा दिला. हमीभावाशिवाय सोयाबीन आणि धान व्यापाऱ्यांना विकू नका, कारण आम्ही पूर्ण खरेदी करू, असा विश्वासही त्यांनी दिला.

नागपुरात लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अग्रवाल समूहाकडून मोठी गुंतवणूक पुढील महिन्यात येणार आहे. नळगंगा जोडणी प्रकल्पाचा भूसंपादन मार्चनंतर सुरू होणार असून, त्यावर अंदाजे १ लाख कोटी रुपये खर्च येईल. MPDA अंतर्गत न्यायालयाने ५० गुन्हेगारांना सोडण्याचा आदेश दिला आहे, जो आम्हाला योग्य वाटत नाही. आम्ही या निर्णयाविरुद्ध न्याय मागणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT