Rohit Pawar on NCP State President Issue
नागपूर: पक्ष वाढवायचा झाल्यास संघटनात्मक फेरबदल हे करावेच लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद 15 वर्षे पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावान,सामान्य कार्यकर्त्याला दिल्यास चांगले होईल. पक्ष संघटनात्मक विविध आघाड्या मजबूत करण्याचे काम करण्यास मी तयार आहे. अर्थातच हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच घ्यावा लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. एकंदरीत पक्षांमधील प्रदेश अध्यक्ष पदावरून सुरू असलेली धुसफूस यानिमित्ताने उघड झाली आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार आले असता माध्यमांशी बोलत होते. एकीकडे आपल्या कार्यकर्तृत्वाचा मोठा गवगवा केला जात असताना मोदी, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात विदर्भातून आवाज उठविला जात आहे. स्वतः शरद पवार यांनी काल फोनवर प्रकृतीची विचारपूस करीत बच्चू कडू यांना समर्थन दिल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षाने मला सात वर्षे प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली. त्यामुळे आता तरुण चेहऱ्याला संधी द्या, अशी मागणी पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करताच एकच हलकल्लोळ झाला. त्यावर राजीनाम्याची घाई करु नका, कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत हा निर्णय आपण सर्वानुमते घेऊ, अशी भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
ते म्हणाले, कार्यकर्त्यांची भावना मला दिसली. तुम्ही पद सोडू नये, अशी त्यांची मागणी दिसत आहे. त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका, हा निर्णय आपण सर्वानुमते घेऊ.