काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवरून भाजप आमदार फुकेंना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.  Pudhari
नागपूर

Rohit Pawar vs Parinay Phuke : काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवरून आरोप-प्रत्यारोप, भाजप आमदार फुकेंना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

खोट्या केसेस आणि वाळू व्यवसायाला फुकेंनी राजकीय पाठबळ दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Rohit Pawar Congress join claim

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. रोहित पवार यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांची गुप्त भेट घेतल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. या दाव्यानंतर रोहित पवार यांनी उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर देत फुकेंवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद : फुकेंचा दावा

रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याचा दावा परिणय फुके यांनी केला. सुप्रिया सुळे यांच्यामुळे रोहित पवार यांना पक्षात डावलले जात असल्याने ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे फुके यांनी म्हटले.

माझ्याबद्दलची काळजी तुम्ही करू नका : रोहित पवारांचे प्रत्‍युत्तर

फुकेंच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी, "माझ्याबद्दलची काळजी तुम्ही करू नका," असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचा उल्लेख करत पवार यांनी या राजकीय जवळिकीवरूनही आरोप केले.

'विरोधी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल'

मुख्यमंत्र्यांशी असलेल्या जवळिकीचा वापर विरोधी कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस दाखल करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांचा वाळूचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा, यासाठीही या राजकीय जवळिकीचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

धान खरेदीच्या मुद्द्यावरूनही फुके लक्ष्य

धान खरेदीच्या मुद्द्यावरूनही रोहित पवार यांनी परिणय फुके यांना सवाल केला. धानाची खरेदी कशी करावी, याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातून फुके छत्तीसगडला गेले होते, याचा उल्लेख करत पवार यांनी त्यांच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले."तिथे ३५०० रुपये धान खरेदी होते, तर इथे २३०० रुपये भाव दिला जातो," असे म्हणत पवार यांनी महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यामुळे धानाच्या दरावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

जरांगेंवर फुकेंची टीका

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून परिणय फुके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. जरांगे पाटील हे बालहट्ट करत असून त्यांच्या धमक्यांना कोणीही घाबरत नसल्याचे फुके यांनी म्हटले. संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन मागण्या लादण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी झाली असून ते वैफल्यग्रस्त झाल्याचा आरोप फुके यांनी केला. त्यामुळेच ते मंत्री आणि आमदारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका करत असल्याचेही ते म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT