Raje Mudhoji Bhosale Visit Devendra Fadnavis
नागपूर: "मराठ्यांना ‘मराठा’ म्हणूनच सरसकट आरक्षण द्या, जेणेकरून 58 लाख कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांसह उर्वरित सुमारे 2.50 कोटी मराठ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल. मराठ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
अलीकडेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी पुढे विचारणा केली की "मनोज जरांगे यांनी केलेली मागणी म्हणजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. पण या मागणीमुळे मराठ्यांच्या हातात नेमके काय आले?"
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत 58 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. जरी या नोंदींमध्ये काही त्रुटी असल्या, तरी ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहेत, त्यांना नक्कीच फायदा मिळायला हवा. पण कागदपत्रांच्या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होणार, हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत उर्वरित 2.50 कोटी मराठ्यांचे काय होणार? असा प्रश्न मराठा समाजाला सतावत असल्याचे भोसले यांनी निदर्शनास आणले.
त्यांनी पुढे सांगितले की, "माझ्या मते, मराठ्यांना ‘मराठा’ म्हणूनच सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे. यामुळे कुणबी नोंदी असलेल्यांपासून ते उर्वरित सर्व मराठ्यांपर्यंत आरक्षणाचा समान लाभ मिळेल. त्यामुळे भविष्यात कोणताही पेच निर्माण होणार नाही."