Chandrashekhar Bawankule Pudhari
नागपूर

Chandrashekhar Bawankule |राज्यात जनतेचा कौल स्पष्टपणे भाजप महायुतीकडे : चंद्रशेखर बावनकुळे

ज्या नगरपालिका भाजपकडे नव्हत्या, त्या यावेळी भाजप आणि महायुतीकडे येणार असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra municipal elections

नागपूर : राज्यात जनतेचा कौल स्पष्टपणे भाजप महायुतीकडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे नगरपालिका आणि आगामी महापालिका निवडणुकीत भाजप–महायुतीचा मोठा विजय निश्चित असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.२०) येथे केला.

यापूर्वी ज्या नगरपालिका भाजपकडे नव्हत्या, त्या यावेळी भाजप आणि महायुतीकडे येणार असल्याचा दावा केला. काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी शिवसेना–भाजपा युतीमध्ये लढत होत असून ज्या ठिकाणी सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, तेथे मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार अजित पवार यांच्याकडे आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य तो निर्णय घेतील. येत्या दोन दिवसांत मुंबईत भाजपा आणि शिवसेनेची कोअर कमिटी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या दोन्ही महानगरपालिका भाजप–महायुतीच्याच ताब्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड परिसरात शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, या गंभीर घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे. बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित सावकारांना अटक करण्यात आली आहे. पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि दोषींना कुणालाही सोडले जाणार नाही.

‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखातून मंत्रिमंडळावर करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, सामना हे विरोधी पक्षाचे मुखपत्र आहे. त्यांच्याकडून आमच्यावर स्तुतिसुमने उधळली जातील, अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही. विरोध करणे हे त्यांचे काम असून ते तेच करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT