Ranganath Swami Patsanstha 100 Crore Fraud
नागपूर : महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था डबघाईस येते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. संचालक मंडळाने 100 कोटींचे बोगस कर्जवाटप केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत रंगनाथ स्वामी पतसंस्थेसह राज्याचे सहकार सचिव, सहकार आयुक्त, लेखा परीक्षक, जिल्हा निबंधकांना पार्टी करण्यात आले आहे. न्यायालयाने स्पेशल ऑडीट संदर्भात आदेश काढला आहे. त्यात सहकार आयुक्त व जिल्हा लेखा परीक्षकांना उत्तर मागितले आहे. संस्थेचे चाचणी लेखपरिक्षण करण्यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी दि. 30 जानेवारी 2024 रोजी अमरावती येथील जिल्हा विशेष लेखपरिक्षक यांना आदेश दिले.
या आदेशात ऑडिट झाल्याच्या दिवसांपासून 90 दिवसांच्या आत लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी तो आला नाही. यामुळे अमोल पुरुषोत्तम नावडे यांनी सभासद, ठेवीदारांचे हित लक्षात घेत नागपूर येथील हायकोर्टात धाव घेतली. केवळ कर्ज वितरणातच नाही तर स्थावर मालमत्ता खरेदीतही मोठे गौडबंगाल असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासक का नियुक्त करण्यात येऊ नये, असा प्रश्न उपस्थित करत याचिककर्त्याने संचालक मंडळ, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर तोफ डागली आहे. संचालक मंडळाने संगनमताने स्टेशनरी, फर्निचर, छपाई आदी विविध वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. याचिकाकर्ते नावडे यांच्यातर्फे अॅड. एस.डी.सिरपुरकर यांनी युक्तिवाद केला.