Farmers Loan Waivers:
शेतकरी कर्जमुक्तीसह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली उद्या, मंगळवारी नागपूरमध्ये 'महा एल्गार' आंदोलन होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षाविरोधात बच्चू कडू यांनी यावेळी 'आरपार'च्या लढ्याची हाक दिली आहे. दरम्यान, या आंदोलनची गरज नाही असं म्हणत भाजप आमदार परिणय फुके यांनी येत्या एक ते दीड वर्षात शेतकरी कर्जमाफी होईल असा दावा केला. त्यांनी जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो असं देखील सांगितलं.
नागपुरातील महा एल्गार आंदोलनासाठी बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसह नागपूरच्या दिशेने कूच करत आहेत. राज्याच्या विविध भागातून, विशेषतः विदर्भातील अनेक गावांमधून शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत.
शेतकऱ्यांचा निर्धार 'आरपार'चा: स्वतः बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर चालवत नागपूरपर्यंत जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात संदेश येत आहेत की, "बच्चू कडू आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही, आता आरपार होऊ द्या." शेतकरी आपल्या घरून स्वतःच्या 'शिदोऱ्या' (जेवणाची व्यवस्था) घेऊन आंदोलनात येत आहेत. मजूर आणि दिव्यांग मेंढपाळ बांधव देखील आपल्या मेंढ्या घेऊन आंदोलनात सामील होत आहेत.
बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना महा एल्गार मोर्चा हा प्रचंड यशस्वी होईल असा विश्वास दर्शवला. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी उद्या साडेदहा वाजता मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे. ती बैठक फलदायी होईल अन् सर्व मागण्या मान्य झाल्या तर आंदोलन करायची गरजच लागणार नाही असं मला वाटतं. अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी देखील याबाबत आपलं मत व्यक्त करत शेतकरी कर्जमाफी १०० टक्के होणार अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, 'आज राज्याची आर्थिक स्थिती नसल्यामुळे मला वाटते की, एका-दीड वर्षात निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो आणि हे सरकार अजून एक वर्षही पूर्ण करू शकलेले नाही."
आंदोलनासाठी महाएल्गार आंदोलनाची तयारी म्हणून विदर्भातील अनेक गावांमधून खास 'चिवडा' तयार करण्यात आला आहे. आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांचा आजचा मुक्काम वर्धा येथे असणार आहे. राज्यातील अनेक मेंढपाळ बांधव दोन दिवसांपूर्वीच मेंढ्यांसह नागपूरच्या दिशेने निघाले आहेत. हे आंदोलन प्रचंड ताकदीचे असेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.