नागपूर : मराठा आरक्षणाचा विषय सरकार दरबारी मार्गी लागल्याचे दिसत असतानाच ओबीसी लढा अधिक आक्रमक होताना दिसत आहे. नागपुरात ओबीसी महासंघाशिवाय विविध ओबीसी संघटनांनी गुरूवारी (दि.१८) महामोर्चाची हाक दिली आहे. दरम्यान अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ उद्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत.
भुजबळ यांचे उद्या गुरूवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन होईल. यावेळी त्यांच्या संमर्थकांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दुपारी ४ वाजता महात्मा फुले सभागृह रेशीमबाग चौक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक, मेळावा होणार असून शासकीय विश्रामगृह रवीभवन येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. ओबीसी महामोर्चात भुजबळ यांच्यासह सर्वांचे स्वागत असेल, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली असल्याने उद्या या दोघांची नागपुरात भेट होणार का? याकडेही ओबीसी समाजाचे, संघटनांचे लक्ष लागले आहे.