नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गोसीखुर्द हा प्रकल्प येत्या दीड दोन वर्षात पूर्ण होईल. बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यास सुरुवात होणार आहे. ज्या शेतजमिनी पाण्यांनी वेढलेल्या आहेत. मात्र, बाधित नाहीत यावरही तोडगा काढला जाईल. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. लागणाऱ्या पैशांची तरतूद प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या निधीत करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री ( विदर्भ आणि तापी खोरे आणि कोकण विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या रवि नगर येथील क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२५ चे उद्घाटन महाजन शुक्रवारी करण्यात आले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाबाबत माहिती देताना महाजन यांनी सांगितले की, गोसेखुर्द प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता ते स्वतः मुख्यमंत्री असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे सांगितले.