खतांचा काळाबाजार नकोच, बावनकुळे यांचा इशारा  File Photo
नागपूर

खतांचा काळाबाजार नकोच, बावनकुळे यांचा इशारा

खतांच्या तक्रारीबाबत सर्व आमदार संबंधित दुकानांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढारी वृत्तसेवा

No Black Marketing of Fertilizers: Bawankule Warns

नागपूर : पुढारी वृत्तसेवा यावर्षी कोणतीही खतांची काळाबाजारी होऊ दिली जाणार नाही, आणि तसे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. खत विक्रेता संपाबाबत राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून कृषी विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्पष्ट केले. खतांच्या तक्रारीबाबत सर्व आमदार संबंधित दुकानांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

खरात चौकशीबाबत बोलताना, या प्रकरणात एसआयटी आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. संबंधितांनी सहकार्य केले नाही, तर ती बाबही कोर्टात मांडली जाईल. प्रकरण न्यायालयीन असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भंडारा येथे अवैध मूर्ती प्रकरणात तहसीलदार आणि प्रशासनावर कारवाईची मागणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, भारताची संस्कृती आणि परंपरा समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल १४० कोटी भारतीयांच्या मनात असलेला आदर त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. मोदी यांची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करणे अयोग्य आहे. वडेट्टीवार हे असे वक्तव्य करून पक्षांतर्गत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असून राहुल गांधी यांची शाबासकी मिळवण्याचा त्यांचा हेतू असू शकतो, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

धीरेंद्र शास्त्री प्रकरणावर संयमाची भूमिका

धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, त्यांनी माफी मागितली असून भारतीय संस्कृतीनुसार माफी स्वीकारली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे सांगत त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले.

‘चार मुले’ या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, त्या विधानामागील भावना समाजहिताची असून संकटकाळात स्वयंसेवक समाजाच्या मदतीसाठी पुढे येतात, ही भूमिका त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती समाजकार्याशी जोडली गेल्यास समाज अधिक सक्षम होईल, अशी त्यामागील भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT