Fire Prevention AI Photo
नागपूर

Nagpur Fire Prevention | अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन; साई अॅकॅडमीची इमारत सील, नागपुरात झोननिहाय कारवाई

सुरुवात; विविध आस्थापनांना नोटिसा, अनधिकृत बांधकामांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Municipal Corporation

नागपूर : नागपूर शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नागपूर महानगरपालिकेने अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन व आणीबाणी विभागाने मंगळवारी (ता. १८) जरीपटका परिसरातील मे. साई अकॅडमी ट्युशन क्लासेसची इमारत सीलबंद केली. यासोबतच शहरातील दहाही झोनमध्ये अग्निसुरक्षा तसेच अनधिकृत बांधकामांबाबत नोटीस कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अग्निसुरक्षा उपाययोजना नसल्याने इमारत सील

मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सुगत नगर अग्निशमन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आदर्श कॉलनी, जरीपटका पोलीस स्टेशनजवळील साई अकॅडमीची पाहणी केली. या पाहणीत इमारतीमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजनांचे पालन होत नसल्याचे तसेच जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळले.

या इमारतीचा भूतळापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत वर्गखोल्यांसाठी वापर केला जात होता. त्याचबरोबर टेरेसवर टिनशेड उभारून तेथेही ट्युशन क्लासेस सुरू असल्याचे आढळून आले. आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजनांशिवाय मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वापर असलेल्या इमारतीचा उपयोग होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ मधील कलम ८(३) अन्वये कारवाई करून इमारत सीलबंद करण्यात आली.

विविध आस्थापनांना अग्निसुरक्षेबाबत नोटिसा

नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राच्या पथकाने मानेवाडा-बेसा रोड परिसरातील विठ्ठल कृपा रेडीमेड शॉप, महाराष्ट्र एम्पोरियम आणि महालक्ष्मी सेलिब्रेशन हॉल यांना नोटिसा बजावल्या. आशीनगर झोनमधील वैशालीनगर-बिनाकी येथील सुपर केम केमिकल, शुभम केमिकल्स, मे. गणेश स्वीट, मौजा नारी येथील जगत सेलिब्रेशन हॉल, कमाल चौकातील के.जी.एन. बिग बाजार, सुगतनगरातील राज ट्रेडर्स, गुरुनानकपुरा भागातील रजा बिग बाजार, कमाल चौकातील हिरा स्वीट आणि इंदोरा भागातील हॉटेल अरेबियन ताज यांनाही आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र न घेतल्याप्रकरणी नोटिसा देण्यात आल्या आहेत.

धरमपेठ झोनमध्ये अनधिकृत बांधकामांची तपासणी

अग्निसुरक्षेबरोबरच शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातही मनपाने मोहीम सुरू केली आहे. धरमपेठ झोनअंतर्गत विविध प्रभागांमध्ये तपासणी करून संबंधित मालमत्ताधारक व संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बांधकामाची मंजूर परवानगी, नकाशे आणि इतर आवश्यक अभिलेख सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कारवाईत अग्निशमन विभाग, एनडीएस, अतिक्रमण विभाग तसेच धरमपेठ झोनचे उपअभियंता आणि सहाय्यक आयुक्त सहभागी झाले. प्रमोद खापरीकर (माहेश्वरी, पंचायत भवन), विनोद जशनानी (इलेक्ट्रॉनिक व्यवसाय) आणि अनिल बेलिया (राजस्थानी महिला मंडळ) यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बांधकाम अधिकृत किंवा अनधिकृत असल्याचे निश्चित केले जाणार आहे. बांधकाम अनधिकृत आढळल्यास बांधकाम थांबविणे, अनधिकृत बांधकाम हटविणे किंवा पाडणे तसेच इतर वैधानिक कारवाई केली जाणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

महापौरांच्या ६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या बैठकीतील निर्देशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी काही मालमत्ताधारकांना मालकी हक्क व हक्क स्पष्ट करणारी अधिकृत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये के.डी.के. कॉलेज रोडवरील सैफी प्रोप्रायटर, खरबी रोडवरील युक्ती अपार्टमेंट व माऊली कृपा इमारतीतील मे. एज्युकेअर कोचिंग क्लासेस आणि वाठोडा चौक ते पारडी रोड परिसरातील मे. हॅपीनेस सेलिब्रेशन हॉल व लॉन यांचा समावेश आहे.

संबंधितांनी मनपाने दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील अग्निसुरक्षा नियमांचे पालन तसेच बांधकामांमध्ये कायदेशीरता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT