Solar Energy Projects Nagpur
नागपूर: नागपूरच्या रणरणत्या उन्हाळ्यात वाहतूक सिग्नलवर चौकात उभ्या राहणाऱ्या वाहनधारकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने एक अनोखे पाऊल उचलले आहे. शहरातील गर्दीच्या प्रमुख चौकांमध्ये 'सोलर रूफटॉप शेड' डिझाइन करण्यासाठी "इनोव्हेट फॉर नागपूर सिटी!" या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अभियांत्रिकी विद्यार्थी, प्रोफेशनल, डिझायनर्स व कन्सलटंट यांच्याकडून यासंदर्भात नवीन संकल्पनांसह डिझाईन मागविले आहे. यातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे.
महापौर निता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी 'सोलर रूफटॉप शेड' स्पर्धेची संकल्पना बैठकीत मांडली.
सिग्नल असलेल्या गर्दीच्या चौकात सोलर रूफटॉप उभारण्यातून चौकात उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांचा उन्हापासून बचाव तर होईल त्याचप्रमाणे सोलरच्या पॅनेलमधून विजेची निर्मिती होणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला सुद्धा हातभार लागणार आहे. यावर जाहिरातदारांना साईन बोर्ड लावण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. या स्पर्धेकरिता अर्ज करण्याची मुदत ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ असून, निवडक डिझाइनचे सादरीकरण २४ एप्रिल २०२६ रोजी मनपा मुख्यालयात होणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके यासंदर्भात लोकांकडून संकल्पना याव्या, लोकांच्या कल्पनांना शहराच्या उभारणीत सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने मनपाच्या वाहतूक विभागातर्फे यासाठी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. शहरातील इंजीनिअरिंगचे विद्यार्थी, प्रोफेशनल, डिझायनर्स व कन्सलटंटने या स्पर्धेत सहभागी होऊन नव्या संकल्पना मनपाला सादर कराव्या.
यासाठी पहिल्या विजेत्याला 25 हजार, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 21 हजार व तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 17 हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे.या स्पर्धेतील विजेत्यांसोबत नागपूर शहराच्या प्रथम नागरिक माननीय महापौर निता ठाकरे यांच्यासोबत कॉफी विथ मेयर या कार्यक्रमात या संकल्पनेबाबत चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच आपले डिजाईन eetrafficnmc01@gmail.com वर पाठवावे. नागपूरला अधिक 'स्मार्ट' आणि 'ग्रीन' बनवण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी केले आहे.