Encroachment Pudhari
नागपूर

Nagpur Encroachment | अवैध बांधकामांविरोधात नागपूर महापालिकेची धडक कारवाई; दहा झोनमध्ये नोटीस सत्राला वेग

सतरंजीपुरा झोनमध्ये अनधिकृत बांधकाम हटविले; विविध व्यावसायिक आस्थापनांनाही नोटिसा

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Municipal Corporation

नागपूर : नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नियमबाह्य वापराविरोधात नागपूर महानगरपालिकेने कारवाईला वेग दिला आहे. महापौर निता ठाकरे यांच्या निर्देशानंतर बुधवारी शहरातील सर्व दहा झोनमध्ये पाहणी व नोटीस बजावण्याची कार्यवाही करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमध्ये यापूर्वी नोटीस देऊनही नियमांचे पालन न करणारे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.

मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांकडून शहरातील विविध भागांतील बांधकामांची पाहणी सुरू असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या दुकाने, कारखाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

लकडगंज झोनमध्ये व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा :

प्रभाग क्रमांक २३ मध्ये विनापरवाना शॉपिंग मॉल अथवा व्यावसायिक आस्थापना चालविल्याप्रकरणी मे. दुल्हेराजा एन. एक्स. प्रो. पोपटलाल नथ्थुलाल पटेल, सुफी होम हार्डवेअरचे सुभाष हेमानी आणि मे. रोशन दिलीप मुनियार (रॉयल एनफिल्ड) यांना नोटिसा बजावण्यात आल्या.

हनुमान नगर झोनमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांवर कारवाई :

कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एका इमारतीची पाहणी करताना तात्पुरते व अंतिम अग्निसुरक्षा मान्यता प्रमाणपत्र न घेता बांधकामाची परवानगी, वापरात बदल तसेच अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमांतर्गत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. यामध्ये दर्शन राऊत, सतिश कुंडनवार, मे. फस्ट क्राय, विनोद टिकले, इक्बाल अहमद कुरेशी, संजय ढाले, शाम भोयर आणि गणेश जसवाणी यांचा समावेश आहे.

धंतोली झोनमध्ये विविध आस्थापनांची तपासणी :

ऑटोमोबाईल दुकाने, हॉटेल्स आणि कपड्यांच्या दुकानांची पाहणी करून अनियमितता आढळलेल्या मे. इंद्रायणी टी.व्ही.एस., मे. हॉटेल ओरम लीफ आणि मे. शिवा फॅशन यांना नोटिसा बजावण्यात आल्या.

धरमपेठ झोनमध्ये कागदपत्रांची मागणी :

संत गजानन सेलिब्रेशनसह संबंधित आस्थापनांमध्ये झालेल्या बांधकामाबाबत मनपाने नोटीस बजावली आहे. बांधकामाची मंजूर परवानगी, नकाशे आणि आवश्यक अभिलेख सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या तपासणीनंतर बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

सतरंजीपुरा झोनमध्ये बांधकाम हटविले :

संबंधित अनधिकृत बांधकामांची यापूर्वी पाहणी करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटीस देऊन मुदत दिल्यानंतरही नियमांचे पालन न झाल्याने मनपाने नियमानुसार अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली.

शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नियमबाह्य वापराविरोधात पुढील काळातही सर्व संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत सातत्याने कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी तसेच व्यावसायिक आस्थापनांनी बांधकाम व वापराबाबत मनपाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT