Nitin Gadkari file photo
नागपूर

Nitin Gadkari: बायकोपेक्षा फाईलवर अधिक प्रेम! नितीन गडकरी भर कार्यक्रमात काय म्हणाले?

केंद्रीय महामार्ग मंत्री आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी आज नागपुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोहन कारंडे

Nitin Gadkari

नागपूर: केंद्रीय महामार्ग मंत्री आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नितीन गडकरी यांनी आज नागपुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. अनेक अधिकारी निर्णय घेणे कसे टाळतात आणि यामुळे विकास प्रकल्पांना कसा विलंब होतो, यावर त्यांनी रोखठोक भाष्य केले.

नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी 'निर्णय क्षमतेवर' अधिक भर दिला.

'बायकोपेक्षा फाईल प्रिय'

गडकरींनी एका अधिकाऱ्याचा किस्सा सांगत त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "अनेक अधिकारी कुठल्याही बाबतीत निर्णय घेणे टाळतात. प्रसंगी आपल्या बायकोपेक्षा त्यांचे फाईलवर अधिक प्रेम असते. तीन-तीन महिने त्यांच्याकडे आलेली फाईल दाबून ठेवतात."

कर्जबाजारी कंत्राटदारांचे दुःख अधिकाऱ्यांना कळत नाही

विलंबाचे गंभीर परिणाम स्पष्ट करताना गडकरी म्हणाले की, महिन्याच्या एक तारखेला पगार मिळणाऱ्याला तीन महिने फाईल मंजूर न झाल्याने समोरच्या व्यक्तीला व्याजावर व्याज भरावे लागते. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना कर्जबाजारी कंत्राटदाराचे दुःख कळत नाही.

त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत खडसावले, "चौकशी करा, धाडी घाला, मात्र एकदाच 'होय' किंवा 'नाही' असा ठोस निर्णय घ्या. उगीच कुणाला वेठीस धरू नका." अनेक प्रकल्प केवळ याच कारणांमुळे रखडतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'चहापेक्षा किटली गरम'

गडकरी म्हणाले, अनेकदा मंत्री कठोर मर्यादा ओलांडून निर्णय घेतात, पण हल्ली 'चहापेक्षा किटली गरम' अशीही उदाहरणे आहेत. काही ठिकाणी मंत्र्यांपेक्षा त्यांचे पीएस (खासगी सचिव) भारी असतात.

तरीही, अनेकजण आपल्या कामावर आणि प्रामाणिकतेवर मोठे होतात, हे त्यांनी नमूद केले. गडकरींनी अधिकाऱ्यांना चांगले निर्णयक्षम अधिकारी होण्याचा सल्ला दिला आणि ज्ञानासोबतच व्यवहारी ज्ञान महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT