Nitin Gadkari Wife Statement Pudhari
नागपूर

Nitin Gadkari: 'तुम्ही कितीही कर्तृत्ववान असाल, बायको ठीक नसेल तर…', गडकरींनी सांगितला लग्नानंतरचा धक्कादायक किस्सा, काय म्हणाले?

Nitin Gadkari Wife Statement: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्तीच्या यशामागे पत्नी आणि कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

Rahul Shelke

Nitin Gadkari Wife Statement: एखादी व्यक्ती कितीही कर्तृत्ववान असली, तरी तिच्या यशामागे कुटुंबाची आणि विशेषतः पत्नीची भूमिका महत्त्वाची असते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. “बायको जर ठीक नसेल तर माणूस कितीही कर्तृत्ववान असो, तो राजकारणात, समाजकारणात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही,” असे गडकरी म्हणाले.

माजी विधान परिषद सदस्य अनिल सोले यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही जुन्या आठवणींना उजाळा देत सामाजिक आणि राजकीय जीवनात कुटुंबाची भूमिका किती महत्त्वाची असते, यावर भाष्य केले.

आपल्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगताना गडकरी म्हणाले, “माझे लग्न झाले त्यावेळी माझ्याकडे शंभर-दीडशे कप चहा व्हायचा. यावर माझ्या बायकोने मला विचारले की मला बायको म्हणून आणले आहे की मोलकरीण म्हणून?” त्यांच्या या आठवणीमुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये हशा पिकला.

सामाजिक आणि राजकीय जीवन जगताना केवळ संबंधित व्यक्तीलाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणी आणि त्रास सहन करावा लागतो, असेही गडकरी यांनी सांगितले. “सामाजिक-राजकीय जीवन जगताना घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागतो,” असे ते म्हणाले.

मुलांच्या संगोपनाबाबत बोलताना गडकरी यांनी पत्नीच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. “मुलं चांगली निघाली, मुलांवर संस्कार चांगले झाले. मी काहीच पाहत नाही; मात्र बायकोने पाहिले नसते तर चिंधड्याच झाल्या असत्या,” असे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यातून कुटुंब, पत्नी आणि मुलांवरील संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित झाले. सार्वजनिक जीवनात काम करताना व्यक्तीच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा, विशेषतः पत्नीचा मोठा वाटा असतो, हा मुद्दा त्यांनी मांडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT