Nitin Gadkari:
नागपूर : "मी ब्राह्मण जातीचा आहे, आम्हाला आरक्षण नाही, परमेश्वराचे हे सर्वात मोठे उपकार मानतो. कोणताही माणूस त्याची जात, पंथ, धर्म किंवा भाषेमुळे मोठा होत नाही तर, त्याच्यातील गुणांनी मोठा होत असतो," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. शनिवारी ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
नागपूरमध्ये हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, आपल्याकडे ब्राह्मण समाजाला महत्व नाही. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मण समाजाला महत्त्व आहे. तिकडे मी जातो तेव्हा सर्व दुबे, मिश्रा, त्रिपाठी यांचे पॉवरफुल राज्य बघतो. सर्व लठ्ठेबाज आहेत. मुळात माझ्या मते कुणीही जात, धर्म पंथाने मोठा होत नाही तर, तो त्याच्या गुणांनी मोठा होतो, असे ते म्हणाले.
प्रत्येक समाजात जे काही असे मोठे लोक आहेत त्यांनी आपल्या समाजातील मुलांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरुण मुलांना योग्य दिशा देत गुणवत्ता वाढीचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण आज सर्वात मोठी समस्या ही तरुणांच्या रोजगाराची आहे, असेही गडकरी म्हणाले.