Nitin Gadkari government remarks
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. शनिवारी नागपूरमधील सुरेश भट सभागृहात एका कार्यक्रमात त्यांनी सरकारला धारेवर धरत सर्वांना आश्चर्यचकित केले. यावेळी गडकरी यांनी महानगरपालिका, एनआयटी किंवा सरकारच्या इतर संस्थांचा काही उपयोग नाही, असा आरोप करून या सर्व व्यवस्था चालत्या वाहनाला पंक्चर करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.
अशा या व्यवस्थेमुळेच आपल्याला दुसऱ्या पद्धतीने काम करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरच्या विदर्भ साहसी संघटनेने भट सभागृहात आयोजित ‘क्रीडा हा एक करिअर सेमिनार’ या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले की, जेव्हा तुमचे चांगले दिवस येतात, तेव्हा खूप कौतुक होते, पण जेव्हा हे दिवस निघून जातात तेव्हा कोणीही तुमची पर्वा करत नाही. म्हणून प्रत्येकाने क्रीडा क्षेत्रात कठोर परिश्रम करावे आणि चांगले करिअर बनवावे. मी आर्थिक तज्ज्ञ किंवा लेखापाल नाही, पण मी एक चांगला आर्थिक सल्लागार आहे. माझ्याकडे पैसे नसतानाही मी ५ लाख कोटी रुपयांचे रस्ते आणि पुलांची कामे केली. मला नागपुरात ३०० स्टेडियम बांधायचे आहेत. पण सरकारी यंत्रणेत काही समस्या आहेत. सरकार ही एक निरुपयोगी गोष्ट आहे. महानगरपालिका, एनआयटी किंवा सरकारच्या अखत्यारीतील इतर संस्थांचा काही उपयोग नाही.
ते पुढे म्हणाले, दुबईहून एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. तो तिथे एक स्टेडियम चालवत होता. आता त्याला नागपूरमधील स्टेडियमचे कंत्राट मिळवून देण्याचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार, सरकार तेथील मैदान, पाणी आणि इतर सुविधा आणि बांधकाम पुरवेल. परंतु ते चांगले चालवण्याची आणि त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. यासाठी तो विविध खेळांसाठी येथे येणाऱ्या तरुणांकडून नाममात्र शुल्क आकारेल. येथे कोणालाही मोफत सुविधा देण्यात येणार नाही, कारण मोफत गोष्टींना काही मूल्य नसते, असेही गडकरी म्हणाले.