नागपूर : राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे यांच्या नेहमीच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपची कोंडी होत आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद त्यांनीच निर्माण केला होता. आता त्यांनी मुस्लिम समाजाने कुर्बानी देण्याऐवजी आभासी पद्धतीने ईद साजरी करण्याचा अफलातून सल्ला देत नवा वाद ओढवून घेतला आहे.
साहजिकच त्यांच्यामुळे भाजपचे नेते अडचणीत आल्याचे दिसून येते. मंगळवारी (दि.6) भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना नागपूरमध्ये पत्रकार परिषद गुंडाळावी लागली. तत्पूर्वी त्यांनी राणे यांच्या मताशी भाजप सहमत नसल्याचे स्पष्ट केले. भाजप सर्वच धर्माचा सन्मान करते आणि प्रत्येक धर्माच्या रितिरिवाजानुसारच त्यांचे सण साजरे व्हावेत, असा आमचा आग्रह असल्याचे सांगितले.
राज्यात गो-हत्या बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने कुर्बानी देऊ नये, असे सांगून आभासी पद्धतीने ईद साजरी करावी असा सल्ला राणे यांनी दिला होता. त्यामुळे मुस्लिम समाजात संताप निर्माण झाला आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय त्यांना अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने नोटीस बजावली जाणार असून या नंतर राज्यात काही अप्रिय परिस्थिती उद्भवल्यास तेच जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.
आज संघटन पर्वाचा आढावा घेण्यासाठी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण नागपूरला आले होते. संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिल्यानंतर राणे यांनी केलेल्या विधानावर त्यांना प्रश्न करण्यात आला होता. त्यांनी ईद संदर्भात राणे यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजपने समर्थन करीत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. जाती, धर्मात तेढ निर्माण होऊ नये, त्यांच्या सामाजिक परंपरा जपल्या जाव्या हीच भाजपची भूमिका आहे. सध्या मी पक्षातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यासाठी आलो आहे. त्यानंतर जेव्हा कधी पत्रकार परिषद घेईन त्यावेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे सांगून त्यांनी पत्रकार परिषदच आटोपती घेतली.