नागपूर - आदित्य ठाकरे हा बाळासाहेबांचा नातू म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. तो ठाकरे आडनाव वापरण्याच्याही लायकीचा नाही, असे म्हणत राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, दोन्ही भावांनी काय करावे, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. ते सोबत आले काय अन् नाही आले काय, काहीही फरक पडणार नाही. पण कुणाचेही कुटुंब एकत्र येत असेल, वाद मिटत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये आम्ही विचार करणे, दखल घेणे अन् दुःखी होण्याची कोणतीही गोष्ट नाही.
ज्यांनी एके काळी ठाकरे कुटुंब तोडले, तेच आता एकत्र येण्याच्या बाता करत आहेत. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, तेव्हा संजय राऊत यांची गाडी जाळण्यात आली होती. तेव्हा अनेक लोक शकुनी मामाच्या भूमिकेत होते आणि आता तेच लोक दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे, यावर लेक्चर देत आहेत, असा चिमटा राणे यांनी काढला.
बडगुजर यांच्याबाबतीत विचारले असता, मुख्यमंत्री बडगुजर यांना भेटले. पण त्यांच्या प्रवेशाचा अधिकृत निर्णय झाला की नाही, याबद्दल मला काहीही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील, त्यानंतरच प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र बडगुजरची हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकले आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू, असे नितेश राणे यांनी सांगितले.