नागपूर

नागपूरची दोन नाटके इंडोनेशियात ‘हाऊसफुल्‍ल’

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राधिका क्रिएशन्स पुणे-नागपूरच्‍या चमुने जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्‍य साधून इंडोनेशियातील बाली येथे 'स्वामी विवेकानंद' व 'सियावर रामचंद्र की जय' या दोन नाटकांचे प्रयोग सादर केले. प्रेक्षकांचा या दोन्‍ही प्रयोगांना हाऊसफुल्‍ल प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे यांनी या दोन्‍ही नाटकांचे लेखन केले असून सारिका पेंडसे यांचे दिग्‍दर्शन लाभले आहे. नागपुरातून १८ कलावंतांची चमू बाली येथे गेली होती. त्‍यांनी सादर केलल्‍या या दोन्ही नाटकांना तेथील रसिकांनी पसंतीची पावती दिली. या प्रयोगांकरिता इंडियन काऊंसिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे सहकार्य लाभले.

बाली येथील रंगभूमी समृद्ध असून तेथे अनेक नाटकांचे प्रयोग होत असतात. इंडोनेशियामधील रसिकांसाठी रामायण हा विषयदेखील नवीन नाही. भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडविणारे 'सियावर रामचंद्र की जय' आणि स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जीवनकार्यावर आधारित 'स्‍वामी विवेकानंद' या नाटकाने तेथील रसिकांना मंत्रमुग्‍ध केले. या दोन्‍ही नाटकांची निर्मिती संजय पेंडसे यांनी केली होती. शनिवारी ३० मार्च रोजी बाली येथे 'स्‍वामी विवेकानंद' नाटकाचा प्रेक्षकांच्‍या आग्रहास्‍तव आणखी एक प्रयोग इंटरनॅशनल कल्‍चरल कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये होणार आहे.

'स्‍वामी विवेकानंद' नाटकात विवेकानंदांची भूमिका शंतनू मंग्रूळकर आणि ललित घवघवे यांनी केली तर 'सियावर रामचंद्र की जय' या नाटकात अनिल पालकर यांनी रामाची भूमिका साकारली. इतर कलाकारांमध्ये अभिषेक काणे, प्रज्वल भोयर, ललित घवघवे, करिश्मा भोरखाडे, मोहन काळबांडे, सुषमा पनकुले, संजीव खटी, स्वप्नगंधा खटी, शुभांगिनी पनकुले, सतीश पेंडसे, देवयानी पेंडसे, नेहा बर्डे, पियूष वानखेडे, सुधीर पाठक, पल्लवी पाठक, कल्याण पेंडसे आदींचा सहभाग होता. या नाटकांचे नेपथ्य, प्रकाशयोजना सतीश पेंडसे यांची होती तर विद्या नागरे, मेधा भांडारकर यांचेही यासाठी सहकार्य लाभले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT