Nagpur murder case
नागपूर : घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या भावाची बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली. ही घटना बुधवारी (दि.७) कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बुद्रुक येथे घडली. इंद्रजीतसिंग भोंड (वय ३५) असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी लहान भाऊ जगदीश सिंग भोंड (वय ३२, रा,धापेवाडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बुद्रुक येथील रहिवासी असणारा मृत इंद्रजीतसिंग बोंड हा ऑटो चालक आहे. त्याच्या लहान भावाला जगदीश सिंग बोंड याला दारूचे व्यसन असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्याला शिकारीचा छंद असल्याने तो नेहमी जंगलात छराची बंदूक घेऊन जात असल्याची माहिती आहे. घरगुती वादातून बुधवारी दुपारी या दोघा भावांमध्ये पुन्हा भांडण झाले. यावेळी शिकारीसाठी निघालेल्या जगदीशसिंग याचा राग अनावर झाला. या रागातून त्याने मोठ्या भावावर गोळी झाडली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली. घटनेनंतर आरोपी भावाने तेथून पळ काढला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.