Illegal Drugs Seizure Nagpur
नागपूर : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच असून, यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून २८ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल फोन असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालत असताना बीट मार्शलला ऑटोमोटिव्ह चौकाजवळ काही जण एमडीची तस्करी करण्याच्या उद्देशाने थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घालून कारवाई केली.
यावेळी ऋतिक उपवंशी, पियूष वाघ आणि देवांग सुनारे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून २८ ग्रॅम एमडी आढळून आली. तसेच तस्करीसाठी वापरली जात असलेली दुचाकी आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे सव्वा तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, जप्त केलेली एमडी त्यांनी कुठून आणली होती आणि ती पुढे कोणाला विक्री करण्यासाठी नेण्यात येत होती, याचा तपास सुरू आहे.
अमली पदार्थांच्या या तस्करीच्या साखळीतील अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास यशोधरानगर पोलीस करत आहेत