Prakash Pohare Vidarbha state demand
नागपूर: वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भातील जनतेचे भले होऊ शकत नाही. गेल्यावेळी दहा दिवस अधिवेशन झाले. यावेळी केवळ सातच दिवसांचे हिवाळी अधिवेशन न्याय देऊ शकत नाही, असा तीव्र संताप शेतकरी नेते, विदर्भवादी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केला.
घोषणाबाजी करीत असताना त्यांना अखेर विधिमंडळ सचिवालयाचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असताना शुक्रवारी सायंकाळी प्रकाश पोहरे यांनी विधान भवन परिसरात वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. राज्यावर दहा लाख कोटींचे कर्ज असलेले दिवाळखोर सरकार आम्हाला न्याय देऊ शकत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विदर्भाचे असले तरी त्यांना मुंबईची मोठी तिजोरी मिळाली असल्याने वेगळ्या विदर्भाचा विसर पडला आहे, असा आरोप पोहरे यांनी केला. मागील अधिवेशनातच आम्ही नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन सहा आठवड्यांचे व्हावे, अशी मागणी केली होती.
मात्र, सातत्याने अधिवेशनाचा कालावधी कमी केला जात आहे. यावेळी आठवडाभराचे अधिवेशन आहे. पुढील वेळी दोनच दिवसाचे अधिवेशन सरकार घेणार का, असा सवाल उपस्थित करताना असा अधिवेशनाचा कालावधी पुन्हा कमी होत गेल्यास आम्ही विदर्भवादी नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आपल्याला अटक करा, अटक करा अशी मागणी ते विधिमंडळ सचिवालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सातत्याने करीत होते.