Nagpur winter session NSUI Student protest
नागपूर: बेरोजगार तरुण, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि.१२) काँग्रेस प्रदेश एनएसयुआयतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाने विधान भवनला धडक दिली. लिबर्टी स्टोपिंग पॉइंटवर हा मोर्चा पोलिसांनी अडविल्यानंतर कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी खबरदारी म्हणून त्रिस्तरीय तगडा बंदोबस्त, बॅरिकेड्स लावले होते. बॅरिकेड्स ओलांडून वारंवार कार्यकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. तर पोलिस त्यांना पुन्हा दुसऱ्या दिशेने ढकलत होते. यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मोर्चा पुढे जाणार नाही शिष्टमंडळ भेटायला जाऊ शकेल अशी ताकीद दिल्यानंतर अखेर या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
विद्यार्थ्यांचा रोजगार, भत्ता, शुल्कवाढ, स्कॉलरशिप विलंब, वसतिगृह समस्या, परीक्षा अनियमितता तसेच विद्यार्थी निवडणुका या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा होता. महाराष्ट्र एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी बारानंतर उत्तर नागपुरातील इंदोरा मैदानातून हा मोर्चा निघाला.
काँग्रेसने सातत्याने तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा लावून धरलेला असल्याने या मोर्चाच्या निमित्ताने आम्हाला नोकरी द्या, भत्ता द्या अशी घोषणाबाजी करीत या विधानसभा घेराव मोर्चाने लक्ष वेधून घेतले.