Nagpur Wathoda Firing Case
नागपूर : वाठोडा परिसरातील नगरसेवकाच्या घरावर मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या ब्लाइंड केसचा नागपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावला आहे. तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्स, डिजिटल व्यवहार, व्हॉट्सअॅप चॅट आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा माग काढला. या तपासातून गुजरात आणि छत्तीसगडमधून सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार आणि एका महिलेचा शोध सुरू आहे.
२६ ऑगस्टच्या मध्यरात्री वाठोडा ले-आउट परिसरातील श्रावणनगर येथे नगरसेवकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारामुळे घराच्या गॅलरीतील काचेचे नुकसान झाले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोपेडवरून दोन जण जाताना दिसून आले. मागे बसलेल्या व्यक्तीने नगरसेवकाच्या घराच्या दिशेने गोळी झाडल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले. मात्र, दोन्ही आरोपींची ओळख सुरुवातीला स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर हे प्रकरण ब्लाइंड केस होते.
घटनास्थळापासून आरोपी कोणत्या दिशेने गेले, याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तब्बल ५०० कॅमेऱ्यांच्या फुटेजचे विश्लेषण करून संशयित वाहनाच्या हालचालींची साखळी तयार करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक तपासातून आरोपींचे संपर्क, मोबाइल लोकेशन आणि संभाव्य ठिकाणांची माहिती मिळविण्यात आली.
या तपासात एआय तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. विविध सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींचे विश्लेषण करून त्यांचा परस्पर संबंध जोडण्यात आला. त्यामुळे तपास पथक आरोपींपर्यंत पोहोचू शकले.
पोलिस तपासानुसार, अंकुश तुमसकर याने नगरसेवकाच्या घरावर गोळीबार केला, तर गुन्ह्यात वापरण्यात आलेली अॅक्टिव्हा ऋषभ नागदेवे चालवत होता. अंकुशवर यापूर्वी ४६, तर ऋषभवर १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.
गोळीबाराच्या तपासात आर्थिक व्यवहाराचाही महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. अमित ठाकरे यांच्या खात्यातून ५० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. हा व्यवहार कोणाच्या सांगण्यावरून झाला, त्याचा गोळीबाराच्या कटाशी संबंध आहे का आणि या पैशांचा वापर कशासाठी करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी आरोपींचे मोबाइल, कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅट, मोबाइल लोकेशन तसेच डिजिटल व्यवहारांची माहिती तपासली आहे. गोळीबारापूर्वी आणि त्यानंतर आरोपी कोणाच्या संपर्कात होते, याचा शोध सायबर पथक घेत आहे. उपलब्ध डिजिटल पुराव्यांच्या आधारे प्रत्येक आरोपीची भूमिका पडताळली जात आहे.
नगरसेवक पोलिसांना ड्रग्जच्या व्यवहारासंदर्भात माहिती देत असल्याचा आरोपींना संशय होता आणि त्यातूनच गोळीबार करण्यात आला असावा, असा तपासाचा एक महत्त्वाचा अँगल समोर आला आहे. मात्र, गोळीबारामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर या कटामागील कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
घटनेपूर्वी आणि घटनेनंतर संशयित वाहनांच्या हालचाली, आरोपींना मिळालेली संभाव्य मदत आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करताना पोलिसांकडून ट्रक अँगलचाही स्वतंत्रपणे तपास केला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्यासोबत एका महिलेचा सहभाग असल्याचा संशय असून तीही फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर गोळीबाराचा आदेश कोणी दिला, आर्थिक व्यवहारामागे कोण होते आणि कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेता संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
ब्लाइंड केसचा तपास करताना कोणतीही ठोस आरोपी माहिती उपलब्ध नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण, सायबर तपास आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला. गुजरात आणि छत्तीसगडपर्यंत तपासाची सूत्रे नेत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित तपास पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.