Nagpur Carbon Dioxide Reduction
नागपूर : महिला गटांकडून चालविण्यात येणाऱ्या स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन केंद्रांमुळे नागपूरमधील कचरा व्यवस्थापन हाताळण्यास मदत होत आहे. वातारवणीय लाभदेखील होत आहेत. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी) आणि असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स यांच्या नव्या अहवालानुसार, स्थानिक स्तरावरील केवळ चार सुका कचरा संकलन केंद्रांमुळे (ड्राय वेस्ट कलेक्शन सेंटर्स - डीडब्ल्यूसीसी) कार्बनडायऑक्साइडच्या उत्सर्जनात दर वर्षी जवळपास 690 टन घट होत असल्याचे दिसून आले आहे.
महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयं सहाय्यता गटांकडून (एसएचजी – बचत गट) चालविण्यात येत असलेल्या या केंद्रांच्या २०२५ मधील आकडेवारीचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. सतरंजीपुरा झोन, मंगळवारी झोन, गांधीबाग झोन आणि हनुमान नगर झोनमधील चार सुका कचरा संकलन केंद्रांवरील कचऱ्याच्या माहितीच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या केंद्रांमुळे कचरा उघड्यावर जाळला न जाणे आणि पुनर्वापर यामुळे उत्सर्जनात घट होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. नोव्हेंबर २०२४ पासून नागपूरमध्ये सध्या १० डीडब्ल्यूसीसी कार्यरत झाली असून त्यापैकी सात केंद्रांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.
स्थानिक स्तरावर प्रभावी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी शहराला सुमारे ४० केंद्रांची, म्हणजे प्रत्येक प्रभागासाठी एका केंद्राची आवश्यकता असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात २०० पेक्षा अधिक रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हा अहवाल सादर करण्यात आला आहे.